लग्न ठरलेल्या डॉक्टर अमोल मुंढे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी जाताना अपघात झाला. हळदीच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Buldhana: एखाद्या व्यक्तीच लग्न जमलेलं असताना मधल्या कालावधीत त्याचा मृत्यू झाल्यावर कुटुंब दुःखी होत. १३ जुलैला लग्न ठरलेलं असताना अमोल शिवानंद मुंढे यांचा मृत्यू झाला आहे. या डॉक्टर तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. २३ जूनला अमरावती जिल्ह्यात कर्तव्यावर असताना रुग्णावर उपचाराकरिता जाताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात तो गंभीर जखमी झाला. शनिवारी हळदीच्या दिवशी मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
नियतीलाच हे लग्न मान्य नव्हतं. ११ जुलै रोजी हळदीच्या दिवशी आपल्याच मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. अमोल शिवानंद मुंढे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथील रहिवासी असलेला डॉ. अमोल अमरावती जिल्ह्यातील भुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्यावर होता.
लग्न जमल्यामुळे घरात आनंद आणि पळापळ सुरु होती. २३ जून रोजी तळेगाव आरोग्य केंद्रात एका रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉ. अमोल दुचाकीने निघाला. मात्र अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अमोल गंभीर जखमी झाला. वेळीच मदत न झाल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टरांना अमोलचा जीव वाचवणे शक्य झाले नाही.
आज होणार होता विवाह
अमोल यांचा विवाह सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे १३ जुलै रोजी ठरला होता. कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली होती पण अमोलच्या मृत्यूमुळे मुंढे कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे. मनाला चटका लावणारी घटना घडल्यामुळे सगळीकडे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
