शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील एका गुरुद्वारात निहंग व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेडमधील एका गुरुद्वारात हल्ला झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी हरसिमरत कौर बादल यांच्याशी बोलून सुखबीर बादल यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात एका निहंग व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता.

या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं नांदेड पोलिसांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. फडणवीस यांनी बादल यांनाही फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी बादल यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनुसार, घटनेनंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. या हल्ल्यामागील हेतू काय होता, याचा तपास करण्याचे निर्देश फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बादल यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अकाली दलाकडून हल्ल्याचा निषेध, सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप

अकाली दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव तलवार यांनी गुरुवारी या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, "सुखबीर सिंग बादल दर्शनासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचं आम्हाला मीडियातून कळलं. त्यांच्यासोबत असलेल्या लोकांशी संपर्क साधल्यावर कळलं की, दर्शनासाठी जाताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या अंगरक्षकालाही दुखापत झाल्याची शक्यता आहे."

ते पुढे म्हणाले, "सुखबीर सिंग बादल हे हिंदू-शीख ऐक्याचे समर्थक आहेत; ते नेहमी पंजाब आणि पंजाबियतबद्दल बोलतात. हा हल्ला थेट सुखबीर सिंग बादल यांच्यावर नसून, पंजाबच्या एकतेवर आणि अखंडतेवर आहे."

तलवार यांनी बादल यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "ज्या व्यक्तीला Z+ सुरक्षा आहे आणि जे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांच्यावर असा हल्ला होणं ही सुरक्षेतील एक मोठी चूकच मानली पाहिजे," असं ते म्हणाले.

याआधीही झाला होता हल्ला

जवळपास दोन वर्षांपूर्वी, डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात 'सेवा' करत असतानाही बादल यांच्यावर हल्ला झाला होता.

तेव्हा नारायण सिंग चौरा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला वेळीच पकडण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता.

२००७ ते २०१७ दरम्यान अकाली दलाच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांवरून अकाल तख्तने बादल यांना 'तनखैया' म्हणजेच धार्मिक गैरवर्तणुकीसाठी दोषी ठरवलं होतं. या धार्मिक शिक्षेचा भाग म्हणून बादल यांनी सुवर्ण मंदिर आणि इतर शीख तीर्थस्थळांवर 'सेवा' केली होती. त्याच दरम्यान २०२४ मध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.

२०२४ च्या हल्ल्यानंतर, अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी पंजाब पोलिसांवर टीका केली होती आणि बादल यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले होते.