सोलापूरच्या एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागली. अनेक कामगार आगीच्या सापळ्यात अडकले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरातील एका टॉवेल कारखान्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ‘सेंट्रल इंडस्ट्री’ या कारखान्याला रात्री अंदाजे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत प्रचंड विध्वंस झाला असून, आतापर्यंत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान असे तिघे जण भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग इतकी प्रचंड आहे की, कंपनीचा काही भाग जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने पाडून अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अग्निशमन विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, तसेच महापालिकेचे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे, तर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून, अडकलेल्या कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापूरमधील ही दुर्घटना अत्यंत भयावह असून, जीवितहानी टाळण्यासाठी यंत्रणांनी झोकून दिलेले प्रयत्न सुरू आहेत. आगीवर लवकर नियंत्रण मिळून अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले जावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.