सार
Ashadhi Wari 2024 : यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये भाविक विक्रमी संख्येने येण्याची शक्यता असून त्या सर्वांना प्रसाद मिळावा यासाठी सध्या 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Ashadhi Wari 2024 : आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकांतून असलेली मागणी पाहून या वर्षी मंदिर समितीने 11 लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनविण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
गेल्या वर्षांपासून 7 कोटी रुपयांची विक्री
सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनविण्यास सुरुवात केली असून गेल्या वर्षीपासून जवळपास 7 कोटी रुपयांची विक्री समितीने केली आहे. भाविकांना देण्यात येणारा हा लाडू प्रसाद दर्जेदार असल्याने याला मोठी मागणी असते. यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने लाडू वाळण्यात अडचणी येऊ शकतात. याचाच विचार करून मंदिर प्रशासनाने आधीपासून लाडू बनवून त्याचे पॅकिंग करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पुढील आठवड्यात रोज दीड लाख लाडू बनवणार
सध्या रोज 25 हजार लाडू बनविले जात असून आता रोज ही संख्या वाढत जाऊन पुढील आठवड्यात रोज दीड लाख लाडू बनविण्याचे उद्दिष्ट ठेऊन कामाला सुरुवात केली जाणार आहे. हे लाडू बनविण्यासाठी चांगल्या दर्जाची चणा डाळ, साखर, शेंगदाणा तेल, काजू, बदाम आणि वेलदोडे याचा वापर करण्यात येत आहे . साधारण 100 किलो चणा डाळ, 150 किलो साखर, 15 किलो तेल, 2 किलो काजू, 2 किलो बदाम आणि वेलदोडे घालून 1 क्विंटल मध्ये 5200 लाडू बनविले जातात. हे लाडू बनवायला मंदिराला साधारण 35 हजार रुपये खर्च येतो आणि भाविकांना लाडू विक्रीतून मंदिराला साधारण 52 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असते.
आषाढी एकादशीसाठी राजगिऱ्याचे 5 लाख लाडू बनवणार
आषाढी एकादशीला हा बुंदीचा लाडू प्रसाद खाता येत नाही यासाठी 5 लाख राजगिऱ्याचे लाडू बनविण्याचेही काम सुरू असून एकादशी दिवशी हा प्रसाद भाविकांना खाता येईल. बुंदीचा प्रसाद गावाकडे नेता येईल अशी व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. सध्या आषाढीसाठी लाडू बनविण्याचे काम सुरु असताना रोजच्या होणाऱ्या विक्रीसाठीही वेगळे लाडू बनवावे लागत आहेत. त्यामुळे मंदिर समितीने आता लाडू बनविण्याचा वेग वाढविण्यासाठी जादा कामगार लावण्यास सुरुवात केली आहे.
लाडू विक्रीसाठी मंदिर समिती स्टॉल उभारणार
भाविकांना दिला जाणारा हा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. बनवलेले लाडू वळण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची मदत घेण्यात आली असून भाविकांना हा प्रसाद कमी पडणार नाही याची काळजी मंदिर समिती घेत आहे. सध्या रोज हजारोंच्या संख्येनी लाडू बनविणे सुरू असून जास्तीत जास्त भाविकांना हा प्रसाद मिळावा यासाठी विविध ठिकाणी हे लाडू विक्रीसाठी मंदिर समितीने स्टॉल उभारले आहेत.
आणखी वाचा :