शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती भेटल्याचा दावा केला आहे. पवारांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही या दाव्याला दुजोरा दिला आहे.

नागपूर: राज्याच्या राजकारणात सध्याच्या राजकारणामुळे एकच खळबळ उडाली आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी आता एक मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे दोन लोक आपल्याला दिल्लीमध्ये भेटायला आल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केल्यामुळं वातावरण बदलून गेलं आहे.

शरद पवार काय म्हणाले? - 

मला आठवतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावं आणि पत्ते माझ्याकडे आता नाहीत. दोघांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं, निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यक्तिंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असताता पण दुर्लक्ष केलं.

राहुल गांधी यांची घेतली भेट -

हे झाल्यावर त्या लोकांनी आणि राहुल गांधी यांच्याशी भेट करून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झालं. हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू असं शरद पवार यांनी म्हटलं असून त्यांच्या बोलण्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं? 

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, मला माहिती अशी आहे की, दोन व्यक्ती शरद पवारांकडे गेले होते, त्यांनी मतदार याद्या मॅन्युपुलेट करून देऊन अमूक-अमूक सीट निवडून देऊ, १६० आकडा त्यांनी सांगितला होता. मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ते बोलले असं कसं होऊ शकतं. त्यांनी हा विषय पूढे काही नेला नाही. दोन व्यक्ती आल्या होत्या हे उभ्या जगासमोर आणि भारताला सांगितलं आहे. मतदार यांद्यामध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती.