Sangali Bailgada Race : सांगलीत पार पडलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेक फेल’ या जोडीने विजेतेपद पटकावून मानाची फॉर्च्युनर गाडी जिंकली. 

Sangali Bailgada Race : सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या शर्यतीत ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेक फेल’ या जोडीने विजेतेपद पटकावत मानाची फॉर्च्युनर गाडी जिंकली. ही स्पर्धा अलिशान गाड्यांच्या बक्षिसांमुळे आणि राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांमुळे प्रचंड गाजली. मैदानावर विजय मिळवताच प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि विजयी बैलजोडींचं कौतुक करण्यात आलं.

राज्यातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा जल्लोष

चंद्रहार पाटलांनी तब्बल 500 एकर मैदानावर ही शर्यत आयोजित केली होती. या भव्य कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘हेलिकॉप्टर’ आणि ‘ब्रेक फेल’ या जोडीने प्रथम क्रमांक मिळवून फॉर्च्युनर कार जिंकली, तर ‘लखन’ आणि ‘सर्जा’ या बैलजोडीने दुसरी फॉर्च्युनर कार पटकावली. शर्यत संपल्यानंतर आयोजक चंद्रहार पाटील यांनी पुढील शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडीचे बक्षीस जाहीर करत प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट केला.

कोड्याचा मळा मैदानावर लाखोंची गर्दी

ही शर्यत सांगलीतील तासगाव-बोरगावजवळील कोड्याचा मळा येथे पार पडली. इतिहासातील सर्वात मोठ्या मैदानावर भरवलेल्या या स्पर्धेत फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 दुचाक्यांसाठी हजारो बैलगाड्या धावल्या. लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीत ‘हेलिकॉप्टर बैज्या’ आणि ‘ब्रेक फेल’ जोडीने ‘श्रीनाथ केसरी’ हा मानाचा किताब पटकावला. आता या शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई मंत्रालयासमोर होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक

या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातील महिला बैलगाडा शर्यत विशेष आकर्षण ठरली. शिंदे यांनी भाषणात सांगितले, “आज येथे रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. एखाद्या फिल्मस्टारसाठीही एवढी गर्दी होत नाही. माझ्या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. हे बैल म्हणजे सेलिब्रिटी आहेत.”

पुढील शर्यतीत बीएमडब्ल्यू बक्षीस

या वर्षीच्या फॉर्च्युनर कार बक्षिसांनंतर, चंद्रहार पाटील यांनी पुढील श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस ठेवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्यातील बैलगाडी मालक आणि शर्यतीप्रेमींच्या उत्सुकतेला उधाण आले आहे. सांगलीतील या शर्यतीमुळे बैलगाडी संस्कृतीचा उत्सव पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.