उबाठा गटाला धक्का देत सचिन अहिर शिंदे गटात दाखल झाले. यानंतर आता आमदार सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी मागे घेतल्याने त्यांची एकमताने निवड झाली.

Sachin Ahir : उबाठा गटातून बाहेर पडलेले आमदार सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीने उमेदवाराचा प्रस्ताव मागे घेतल्याने सभागृहात सर्वानुमते अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करत त्यांच्या राजकीय अनुभवाचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विरोधकांनीही घेतला प्रस्ताव मागे

सत्ताधारी महायुतीकडून सचिन अहिर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच महाविकास आघाडीकडून ज. मो. अभ्यंकर यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र सभागृहाची परंपरा जपत उपसभापतीची निवड सर्वानुमते व्हावी, या भूमिकेतून उबाठा) आमदार अनिल परब यांनी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर सर्व पक्षांच्या सदस्यांनी अहिर यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.

सर्व पक्षांकडून प्रस्तावाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी सचिन अहिर यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. तसेच विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला आणि धैर्यशील कदम यांनी त्याला अनुमोदन दिले. शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांनी प्रस्ताव मांडला आणि रविंद्र फाटक यांनी त्याला पाठिंबा दिला. बहुमताने प्रस्ताव मंजूर होताच विधानपरिषदेचे सभापती यांनी सचिन अहिर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

'अहिर' म्हणजे निर्भीड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. याशिवाय फडणवीस यांनी सचिन अहिरांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. वर्ष 1999 मध्ये आपण आणि सचिन अहिर एकाच वेळी आमदार म्हणून निवडून आलो होतो, अशी आठवण फडणवीसांनी सांगितली. 'अहिर' या शब्दाचा अर्थ 'गोपालक आणि निर्भीड' असा होते. यामुळे सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय आयुष्यात निर्भीडपणे काम केल्याचा अनुभव असल्याचे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षानेही सभागृहाचा सन्मान राखत सहमती दर्शवली, याबद्दल त्यांनी त्यांचेही आभार मानले.

'योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात ते पारंगत'

सचिन अहिर हे कामगार चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. अहिर यांनी तीन वेळा आमदार आणि राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे. सभागृहात उपसभापती म्हणून प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.

एकनाथ शिंदेंची सचिन तेंडुलकरशी तुलना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सचिन अहिर यांचे स्वागत केले. "प्रत्येक खेळाडूचे वेगळे गुण असतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता सचिन अहिर यांच्यात आहे. एक सचिन (सचिन तेंडुलकर) क्रिकेटमधून निवृत्त झाला, तर दुसरा सचिन आता नव्या इनिंगला सुरुवात करत आहे," असे म्हणत त्यांनी अहिर यांची तुलना क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्याशी केली. यावेळी त्यांनी शायरी सादर करतही त्यांचे अभिनंदन केले.

Scroll to load tweet…