कोकणात तुफान पाऊस, जगबुडी, कुंडलिका, वशिष्टी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

| Published : Jul 21 2024, 04:50 PM IST

Konkan Heavy Rain

सार

Konkan Heavy Rain : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

 

Konkan Heavy Rain : गेल्या काही दिवसांपासून कोकणात तुफान पाऊस सुरू असून रविवारच्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांमध्ये चिपळूण आणि खेडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. रविवारीही जिल्ह्याला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पावसाची काहीशी संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगडमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर दक्षिण रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर रविवारीही पुन्हा वाढला आहे.

जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड दापोली मार्गावर असलेल्या नारंगी नदीला देखील पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या जगबुडी नदी 9 मीटर पातळीच्या खालून वाहत असली तरी पावसाचा जोर असल्याने खेड शहरावर पुराची टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासन या सर्व परिस्थिवर लक्ष ठेऊन असून नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्यात.

वाशिष्ठी नदीला पूर येण्याची शक्यता

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. वाशिष्टी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मात्र सध्या समुद्राला भरती असल्यामुळे चिपळूण शहरातील नाईक कंपनी परिसरात वाशिष्टी नदीचे पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी असला तरी सह्याद्री पट्ट्यात पाऊस असल्याने वशिष्ठ नदीला पूर आला आहे. चिपळूण प्रशासनाकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना वेळोवेळी प्रशासनाकडून पुराची आणि पावसाबाबत माहिती आणि सूचना दिल्या जात आहेत.

दुपारी 1 वा वशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाणी पातळी 4.42 मी आहे. पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली जरी असली तरी दु 1.10 वा भरती आहे. त्यामुळे पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहेत. सध्या पाऊसही कमी आहे. सध्या कोळकेवाडी धरणाच्या सर्व मशीन बंद करण्यात आलेल्या आहेत. कोळकेवाडी धरणाची पातळी १३३.८० मी आहे. पुढील एक तास नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रायगडच्या कुंडलिका नदीला पूर

शनिवारपासून कोकणासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रोहा येथील कुंडलिका नदी देखील इशारा पातळीच्या बाहेर गेल्याने येथील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या नदीकिनारी असलेल्या अनेक गावांना पाण्याचा धोका निर्माण होऊ नये, याकरिता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळते.

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचे पात्र फुगले

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. खेड तसेच राजापूरची अर्जुना व कोदवली नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. त्याचबरोबर राजापूरच्या अर्जुना नदी तसेच गोदावरी नदीचा राजापूर शहराला मागील दोन दिवसापासून पुराच्या पाण्याचा वेढा असून रविवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी शिरु लागले आहे.

एकंदरीत मागील तीन दिवसापासून रत्नागिरी जिल्हा अलर्ट मोड वरती असून त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्हा सर्वत्र रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जर हा पाऊस असाच पडत राहिला तर मात्र राजापूर ,खेड, चिपळूण, संगमेश्वर या बाजारपेठा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : 

Mumbai Heavy Rain Updates : मुंबईत पावसाचा कहर, पोलिसांनी मुंबईकरांना केलं अलर्ट