Pimpri Chinchwad Traffic Advisory : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी १० ते रात्री १० या वेळेत अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. भोसरी, चिखली- मोशी आणि चाकण परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pimpri Chinchwad Traffic Advisory : रामनवमीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात मिरवणुका काढल्या जाणार आहेत. शहरातील विविध भागांमध्ये होणाऱ्या या भव्य मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. अनेक प्रमुख रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहेत वाहतुकीतील बदल?
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंदी असेल. रामनवमी मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
भोसरी परिसरात रस्ते पूर्णपणे बंद
भोसरी परिसरात हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड तसेच दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातील सर्व वाहतूक आळंदी रोडमार्गे वळवण्यात येणार आहे.
चिखली- मोशी भागात पर्यायी मार्गांचा वापर करा
चिखली आणि मोशी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावरून मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कुदळवस्तीकडे जाणारी वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी भारतमाता चौकाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा.
चाकण परिसरातही निर्बंध लागू
चाकण परिसरातील चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक परिस्थितीनुसार वळवण्यात येणार आहे. या भागातही मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
मिरवणुकीत सहभागी वाहने आणि रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व खाजगी व सार्वजनिक वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दिवसभर शहरातील मुख्य चौकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


