Rajmata Jijau Bus: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) ३,००० नव्या 'राजमाता जिजाऊ' स्मार्ट बसेस दाखल करत आहे. या बसेस आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, सुरुवातीला मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या प्रमुख मार्गांवर धावतील. या बससेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

मुंबई: लालपरी, शिवनेरी आणि हिरकणीनंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या नावाने आता एसटीच्या ताफ्यात ३,००० नव्या 'स्मार्ट बसेस' दाखल होत आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

उद्या विधानभवन परिसरात दिमाखदार सोहळा

या महत्त्वाकांक्षी बससेवेचे लोकार्पण उद्या, २४ मार्च २०२६ रोजी विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटन होईल. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कशी आहे नवी 'राजमाता जिजाऊ' बस?

प्रवाशांच्या आरामाचा विचार करून या बसची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे.

आसन क्षमता: या बसमध्ये ३ बाय २ अशी आसन व्यवस्था असून एकूण ५६ प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. (सर्वसाधारण बसपेक्षा जास्त क्षमता).

अत्याधुनिक सुविधा: या बसेस पूर्णपणे 'स्मार्ट' असून त्यामध्ये सुरक्षिततेची प्रगत साधने आणि आरामदायी सीट उपलब्ध असतील.

नियोजन: सुरुवातीला या बसेस मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या गर्दीच्या मार्गांवर धावतील.

नागपूरकरांना मिळणार पहिला मान!

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची प्रत्यक्ष सुरुवात नागपूर शहरातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूरच्या ताफ्यात ५० बसेस दाखल होतील. दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी या गाड्या 'गेम चेंजर' ठरणार आहेत.

परिवहन मंत्र्यांचा विश्वास

"राजमाता जिजाऊ बससेवेमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केवळ मजबूत होणार नाही, तर प्रवाशांना परवडणाऱ्या दरात 'लक्झरी' प्रवासाचा अनुभव मिळेल," असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.