मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवासस्थानी भेट घेतल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खरंतर, नागरिकांच्या काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होती असे बोलले जात आहे. 

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था निवडणुकीत ठाकरे ब्रॅण्डला धक्का बसल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच उधाण आले आहे. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन आल्याचेही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत आधीच चर्चा सुरू आहे. अशातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट नागरिकांच्या तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेतली. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यातील स्थानिक नागरिकांनी जमिनीशी संबंधित मुद्यांवर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच ही भेट झाली असल्याचे सांगितले जात आहे.

बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीचा संदर्भ

राज ठाकरे यांनी बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली, तरी या दोन्ही घटनांचा परस्परांशी काहीही संबंध नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या भेटीत विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांवरच भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पूर्वीची गुप्त भेट आणि चर्चांचा भडका

याआधीही मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील एका तारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली होती. त्या भेटीमुळेही राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा झालेल्या या भेटीमुळे आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आल्याचे म्हटले आहे. खरंतर, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता असे संजय राऊत यांनी म्हटले. याशिवाय त्यांना मतदानासाठी विचारण्यातही आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जबाबदारी दिली गेली आहे. यामुळे राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरही भाष्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, दोघांमध्ये काहीतरी चर्चा होत आहे तर होऊ द्या. याआधीही दोघे अनेकदा भेटले आहेत. याशिवाय राज्यामधील वेगवेगळ्या प्रश्नांवर दोघांची चर्चा झाली असावी.