मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.अशातच हवामान खात्याने आजचा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात दोन दिवसांपासून पावसाच्या सरी सुरू असून गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम

मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळपर्यंतही हजेरी लावली. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या कालावधीत कुलाबा येथे ८६.६ मिमी आणि सांताक्रुझ येथे ८४.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात मुंबई शहरात २८.५७ मिमी, पूर्व उपनगरात ३९.५० मिमी आणि पश्चिम उपनगरात ३५.०९ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे व नवी मुंबईतही पावसाचा जोर होता.गुरुवारीही मुंबईत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून अधूनमधून ४०-५० किमी/तास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.

विदर्भात पुराचा धोका

पूर्व विदर्भात २५-२६ जुलैदरम्यान धरणांच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहण्याची आणि पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं आहे.

मुंबईत सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती

मुंबईत २४ ते २७ जुलैदरम्यान सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. यामध्ये २६ जुलै रोजी दुपारी १.२० वाजता ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. गुरुवारी सकाळी ११.५७ वाजता ४.५७ मीटर, शुक्रवारी १२.४० वाजता ४.६६ मीटर आणि रविवारी १.५६ वाजता ४.६० मीटर लाटा असतील.

महापालिकेने नागरिकांना भरतीच्या वेळेत समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भरती आणि मुसळधार पावसाचा एकत्रित परिणाम सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता निर्माण करतो. त्यामुळे पंपिंग स्टेशनचे दरवाजे आणि फ्लडगेट्स बंद ठेवले जातात**, ज्यामुळे निचऱ्याचा वेग कमी होतो.

सावध राहा, सुरक्षित राहा!

पावसाच्या या इशाऱ्यामुळे प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी अधिकृत इशाऱ्यांकडे लक्ष ठेवावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासन व हवामान खात्याने केले आहे.