Raigad Heavy Rain : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोलाड आणि आंबेवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट कामांमुळे पाणी साचून नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, कोलाड आणि आंबेवाडी नाका परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट कामं, कुंडलिका आणि गोदी नद्यांच्या ओव्हरफ्लो झालेल्या कालव्यांमुळे या भागातील बाजारपेठा, दुकाने, आणि घरात पाणी शिरल्याने स्थानीय नागरिक आणि दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली आहे.

सर्व्हिस रोडवरून वाहतंय नदीचं पाणी!

कोलाड आणि आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठांमध्ये कालव्याचं पाणी रस्त्यांवर आणि दुकानदारांच्या दुकानात शिरल्याने हाहाकार माजला आहे. आंबेवाडी, वरसगाव परिसरात डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याचा लोंढा घरात शिरल्याने नागरिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

अर्धवट कामांचा गंभीर परिणाम

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पूल आणि गटारांच्या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे, पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून राहणं, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्लॅब कोसळलेले, गटारे उघडी टाकलेली आणि जलवाहिन्यांचा बोजवारा उडालेला दिसतोय.

घरात शिरले पाणी, संसाराची राखरांगोळी

खांब परिसरातील नरेंद्र जाधव, महादेव सानप, समीर म्हात्रे, दत्ता चितळकर यांच्यासह अनेक कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने, जीवनावश्यक वस्तू, फर्निचर आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी.

शाळा बंदची उशिरा सूचना, पालक संतप्त

अतिवृष्टीमुळे शाळा, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र ही सूचना सकाळी ९.३० च्या सुमारास मिळाल्याने, अनेक विद्यार्थी आधीच शाळेकडे रवाना झाले होते. काहींनी तर मुसळधार पावसात शाळा गाठली देखील. यामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापन दोघांचीही मोठी धावपळ झाली. पालकांनी ही सूचना वेळीच देण्यात आली असती तर गोंधळ टळला असता, अशी नाराजी व्यक्त केली.

प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांनी सांगितले की, "दुकानदारांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी." अनेक ठिकाणी पाणी अजूनही साचलेलं असून, दरवर्षीचा हा पूरप्रश्न प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिकच गंभीर होत आहे.

निसर्गाचा इशारा की दुर्लक्षित व्यवस्थापनाचा परिणाम?

रायगडातील ही स्थिती केवळ मुसळधार पावसामुळे नव्हे, तर नियोजनशून्य विकासकामं आणि अर्धवट राहिलेल्या सुविधांमुळे निर्माण झालेली संकटस्थिती आहे. आता प्रशासनाने फक्त पंचनाम्यावर न थांबता, दीर्घकालीन उपाययोजना राबवणं गरजेचं आहे.