Pune Traffic Diversions : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर सज्ज झाले असून ३१ डिसेंबरच्या रात्री होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे बदल केले. कॅम्प, फर्ग्युसन रोड आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सायंकाळपासूनच वळवण्यात आली.
पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास उरले असून पुणेकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, ३१ डिसेंबरच्या रात्री होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या मार्गांवर मोठे बदल केले आहेत. कॅम्प (लष्कर), फर्ग्युसन रोड आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सायंकाळपासूनच वळवण्यात आली आहे.
कॅम्प (लष्कर) भागातील महत्त्वाचे बदल
लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्ता (MG Road) आज सायंकाळी ५ वाजेपासूनच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.
पर्यायी मार्ग: वाय जंक्शनकडून येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथून कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात आली आहे.
इस्कॉन मंदिर आणि व्होल्गा चौकाकडून येणारी वाहने आता ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे जातील.
एफसी रोड आणि जेएम रोड (डेक्कन परिसर)
डेक्कन आणि शिवाजीनगर भागात सेलिब्रेशनसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे खालील बदल करण्यात आले आहेत.
फर्ग्युसन रस्ता (FC Road): गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता पहाटे ५ वाजेपर्यंत वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील.
जंगली महाराज रस्ता (JM Road): झाशीची राणी चौकातून पुढे जाण्यास बंदी असेल. वाहनचालकांनी महापालिका भवन किंवा ओंकारेश्वर मंदिर मार्गाचा वापर करावा.
कोथरूड/कर्वे रोड: येथून येणारी वाहने खंडुजीबाबा चौकात थांबवून ती विधी महाविद्यालय (Law College Road) किंवा प्रभात रस्त्याकडे वळवली जातील.
महत्त्वाच्या टिप्स
शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
नो-पार्किंगमध्ये वाहने लावल्यास कारवाईची शक्यता आहे.
हे बदल आज सायंकाळी ५ ते उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहतील.


