Bhima Koregaon Bus Service : भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी PMPML ने विशेष बससेवेचे आयोजन केले. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पार्किंग तळांपासून विजयस्तंभापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध असेल. 

पुणे : भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी १ जानेवारी रोजी देशभरातून लाखो अनुयायी पुण्यात दाखल होतात. या अनुयायांचा प्रवास सुखकर व्हावा आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) कंबर कसली आहे. पीएमपी प्रशासनाने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांसाठी मोफत आणि अतिरिक्त बससेवेचे विशेष नियोजन जाहीर केले आहे.

पार्किंगपासून विजयस्तंभापर्यंत मोफत प्रवास!

प्रशासनाने लोणीकंद आणि शिक्रापूर परिसरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. या पार्किंग तळांपासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.

३१ डिसेंबर: दुपारी ४ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ७५ मोफत बसेस धावतील.

१ जानेवारी: पहाटे ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुमारे २५० मोफत बसेस उपलब्ध असतील.

कुठून मिळेल मोफत बस?

तुळापूर फाटा, लोणीकंद (कुस्ती मैदान), खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा, पेरणे गाव, शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग (वक्फ बोर्ड), पिंपळे जगताप–चाकण रस्ता आणि वढू पार्किंग.

शहरातील 'या' ६ ठिकाणांहून सुटणार जादा बसेस

केवळ पार्किंग ठिकाणांवरच नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून थेट लोणीकंदपर्यंत जाण्यासाठी १०५ अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेससाठी नियमित तिकीट दर लागू असतील.

प्रस्थान ठिकाणे: १. पुणे स्टेशन २. मनपा भवन ३. दापोडी (मंत्री निकेतन) ४. ढोले पाटील रस्ता (मनपा शाळा) ५. अप्पर डेपो बस स्थानक ६. पिंपरी (आंबेडकर चौक)

प्रशासनाचे आवाहन

गर्दीचे योग्य नियोजन व्हावे आणि अनुयायांची गैरसोय टाळता यावी, यासाठी पीएमपीने मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा सज्ज ठेवला आहे. विजयस्तंभाच्या परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.