रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष, महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी विधानसभा लढणार

| Published : Jul 24 2024, 04:41 PM IST

Ravikant Tupkar
रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष, महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी विधानसभा लढणार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी रविकांत तुपकर यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी ही घोषणा केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज संघटना नावारुपाला आली की माझी गरज संपली'

यावेळी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, परवा जो धक्कादायक निर्णय स्वाभिमानीने माझ्याबाबत घेतला, संघटनेपासून मला वेगळे केले, राजू शेट्टी यांची जी भूमिका होती ती ऐकून मला धक्का बसला. बुधवारी 4 तास आमची चर्चा केली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक वेळा मी जेलमध्ये गेलो, शेकडो पोलीस केस अंगावर घेतल्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. २००७ मध्ये आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत आलो तेव्हा संघटना कोल्हापूर पर्यंत मर्यादित होती. आज संघटना नावारुपाला आली आणि माझी गरज संपली.

त्याचबरोबर रविकांत तुपकर पक्षनेतृत्त्वावर टीका करत असून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि त्यांचा आता काहीही संबंध राहणार नसल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितले होते. रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, जालिंदर पाटील यांच्या आरोपाला उत्तर देणे मला बंधनकारक आहे. लालबिल्ला तळ हाताच्या फोडासारखा सांभाळला आहे.

जालिंदर पाटील काय म्हणाले होते?

"लोकसभा निवडणूक तुपकर यांनी पक्षाच्यावतीने लढवणं अपेक्षित होते, तरीही ते अपक्ष म्हणून लढले. तरीही स्वाभिमानीचा एक कार्यकर्ते म्हणून शेट्टी यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतरही तुपकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले होते. ते मागील तीन ऊस परिषदेसह अन्य कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती राहिलेले नाहीत. तुपकर सातत्याने पक्षविरोधी कृत्ये करत आहेत. राजू शेट्टी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शिस्त पालन समितीसमोर उपस्थितीत राहून आपले म्हणणं मांडण्याची नोटीस काढली होती. पण, ते शिस्त पालन समितीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी परस्पर विधानसभेला विदर्भातील सहा जागा लढविण्याची घोषणादेखील केली.", स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले.

"आता ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही", असं जालिंदर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा :

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार