Pune Municipal Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत नव्याने समाविष्ट गावांतील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने चार प्रभागांत निवडणूक खर्च १२० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची चर्चा आहे.  

Pune Municipal Election 2026 : पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा पैशांची ताकद केंद्रस्थानी आली असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील उमेदवारांनी पहिल्यांदाच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने खर्चाचे आकडे चक्रावून टाकणारे ठरत आहेत. निवडणुकीआधीच सर्व्हेमध्ये वरचढ ठरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला असून, प्रत्यक्ष निवडणुकीसाठी प्रत्येकी १५ ते २० कोटी रुपयांची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स यांनी दिले आहे. 

एका प्रभागात चार-चार उमेदवार, खर्चाचा आकडा गगनाला

निवडणूक लढतीत एका प्रभागात प्रमुख पक्षांचे चार-चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या आठ उमेदवारांनी प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च केल्यास केवळ चार प्रभागांतच हा खर्च १२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रभागांतील कार्यकर्ते मालामाल झाल्याची चर्चा असून, वस्ती भागात पैसे वाटपावरून हाणामारीच्या घटनाही घडल्याचे आरोप होत आहेत.

उपनगरांतील लढती चुरशीच्या, मोठ्या नेत्यांच्या सभा

महापालिका निवडणुकीच्या लढती आता रंगतदार टप्प्यात पोहोचल्या आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभांनी वातावरण तापले असून, पुणे शहराच्या उपनगरांमधील लढती विशेषतः चुरशीच्या ठरत आहेत. जाणकारांच्या मते, प्रत्येक प्रभागात किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून, यामुळे निवडणूक यंत्रणांवरही ताण वाढला आहे.

३२ गावांचा समावेश, निवडणुकीचे गणित बदलले

पुणे महापालिकेत २०१७ आणि २०२१ मध्ये ३२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना जुन्या प्रभागांशी जोडून नव्या प्रभागांची रचना करण्यात आली. या चार प्रभागांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांनी निवडणूक गणितच बदलून टाकले आहे. प्रत्येकी १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याच्या आणाभाका घेतल्याने दोन प्रमुख पॅनेलमध्ये प्रत्येकी ६० कोटी, असा एकूण १२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची चर्चा आहे.

आचारसंहितेची धिंडवडे, यंत्रणाही चक्रावल्या

या प्रभागांमध्ये महापालिकेच्या आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र असून, दररोज त्याची धिंडवडे निघत असल्याची चर्चा खासगीत रंगली आहे. पैशांचा पाऊस पडत असल्याच्या आरोपांमुळे निवडणूक यंत्रणाही चक्रावून गेल्या असून, येत्या काळात कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.