पुण्यातील खराडी येथे झालेल्या पार्टीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्याचे प्रकरण सध्या तापले आहे. यातच आता एक अपडेट समोर आले असून पोलिसांना शुक्रवारीही पार्टी केल्याचे समजल्याचे सांगितले जात आहे. 

Pune : खराडी येथील हॉटेल ‘स्टेबर्ड सूट’मध्ये शुक्रवारीही पार्टी झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने शुक्रवार ते रविवारदरम्यान हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या पार्टीचीही चौकशी सुरू असून, त्या संदर्भातील CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सात जणांना अटक

या ड्रग पार्टी प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर, निखील पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, ईशा सिंग आणि प्राची शर्मा** या सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात समोर आले आहे की, शुक्रवारीच्या पार्टीत निखील पोपटाणी, श्रीपाद यादव आणि दोन तरुणी सहभागी होत्या. या पार्टीतही अमली पदार्थांचे सेवन झाले का, याचा शोध घेण्यात येत आहे. हॉटेलमधील तिन्ही दिवसांचे CCTV फुटेज पोलिसांनी मिळवले असून त्याची चौकशी सुरु आहे.

मद्यप्राशनाचे ससून रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट

ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, डॉ. खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासह इतर पाचही संशयितांचे रक्त व लघवी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संबंधित अहवाल येण्यासाठी काही दिवस लागतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. खेवलकर यांचा बचाव

डॉ. खेवलकर यांनी त्या दोन तरुणींना ओळखत नसल्याचा दावा केला असून, त्यांनी पार्टीचे आयोजन केले नसल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्या तरुणी त्या ठिकाणी कशा पोहोचल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची पार्श्वभूमीही पोलिस तपासत आहेत.

रोहिणी खडसे आयुक्तालयात दाखल

या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या व डॉ. खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे सोमवारी रात्री पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या. त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेतली. चौकशी पूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि कोणावरही अन्याय होऊ नये, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.