पुण्यामध्ये धावत्या कारच्या धतावर बसून स्टंटबाजी करणाऱ्या कपलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच प्रकरणावरुन पोलिसांकडे कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे शहरातील खराडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने भररस्त्यात धावत्या कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत रोमान्स केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भररस्त्यात जीव धोक्यात घालणारी कृत्ये
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर घडला. कार सरळ मार्गाने जात असताना तरुण आणि तरुणी वाहनाच्या रूफटॉपवर बसून रोमँटिक पोज देत होते. या दृश्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित झाले. काही सेकंदांचा हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार वर्तनावर नागरिकांनी तीव्र टीका केली. “हे केवळ स्वतःच्या जीवाशी खेळणे नाही, तर इतरांच्या सुरक्षिततेलाही धोका आहे,” असे अनेकांनी मत व्यक्त केले.
कायद्याचे उल्लंघन
कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा इतर प्रतिबंधित जागेत स्टंट करणे हा दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारच्या धोकादायक स्टंटबाजीमुळे दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, स्टंटमुळे इतरांना इजा झाली तर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावरील सुरक्षितता आणि सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालण्याच्या प्रवृत्तीवर चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील यापूर्वीच्या घटना
काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरात आणखी एक धोकादायक प्रकार घडला होता. एका दुचाकीवर तरुणी पेट्रोल टँकवर उलटी बसलेली होती, तर चालक दुचाकी चालवत होता. आजूबाजूच्या लोकांनी अनेक व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले, मात्र या जोडप्याने दुर्लक्ष केले. जाणारे-येणारे त्यांच्याकडे पाहत होते, पण त्यांनी ना दुचाकी थांबवली, ना पवित्रा बदलला. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला, ज्यावर काहींनी ही अश्लीलता असल्याचे म्हटले, तर काहींनी हे धोकादायक वाहनचालकपण असल्याचे मत व्यक्त केले.


