- Home
- Maharashtra
- Pune News: थंडीत पुणेकरांना महापालिकेचा 'धक्का'! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास आता थेट दंड!
Pune News: थंडीत पुणेकरांना महापालिकेचा 'धक्का'! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास आता थेट दंड!
Pune Bonfire Ban Rules: महाराष्ट्रात वाढलेल्या थंडीच्या लाटेत पुणे महानगरपालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात उघड्यावर शेकोटी पेटवण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पुण्यात शेकोटी पेटवण्यास 'बंदी'!
मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून, अनेक ठिकाणी तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील बहुतेक भागांत थंडीची लाट पसरत असताना, अनेक जण उघड्यावर शेकोटी करून गारठ्यापासून बचाव करताना दिसतात. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी परिसरातही शेकोट्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, आता जर कोणी पुणे शहरात उघड्यावर शेकोटी पेटवली, तर त्यांच्या विरोधात पुणे महानगरपालिका कारवाई करणार आहे. होय, तुम्ही बरोबरच वाचत आहात थंडीपासून आरामासाठी लावलेली शेकोटी आता दंडाचे कारण ठरू शकते!
शेकोटी पेटवणे का होणार गुन्हा? महापालिकेने दिले कारण
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले की उघड्यावर पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्यांमध्ये लाकूड, कोळसा किंवा कचरा जाळला जातो. यामुळे
धूर,
कार्बन मोनोऑक्साइड,
आणि इतर हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन
शहरातील हवा गंभीरपणे प्रदूषित होत आहे.
वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम थेट नागरिकांच्या श्वसन आरोग्यावर होत असून, दमा, अस्थमा आणि इतर श्वसनविकारांचा धोका वाढतो. याला आळा बसावा म्हणून PMC ने उघड्यावर शेकोटी पेटवण्यावर दंडात्मक कारवाईची घोषणा केली आहे.
गृहनिर्माण संस्था, सोसायट्या आणि सुरक्षा रक्षकांवर विशेष लक्ष
PMC च्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सोसायट्या, व्यापारी संकुले आणि निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवताना दिसतात. या शेकोट्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा मोठ्या प्रमाणात परिणाम हवा गुणवत्तेवर होत असल्याने, शहरातील सर्व भागांमध्ये रात्री शेकोटी पेटवण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.
हवेच्या गुणवत्तेसाठी कडक भूमिका, पुणेकरांची कसोटी
हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक नियम लागू केले असून, त्या अनुषंगाने PMC ने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या आदेशाचे पालन पुणेकर कितपत करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

