पुण्यातील औंधमधील वर्दळीच्या राहुल हॉटेलसमोर रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्यामुळे वृद्ध खाली पडला आणि त्याचवेळी मागून आलेल्या कारने त्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई : पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी पुन्हा एकदा जीव घेतला आहे. औंधमधील राहुल हॉटेलसमोर घडलेल्या भीषण अपघातात एका 61 वर्षीय वृद्ध नागरिकाचा करुण अंत झाला. दुचाकी चालवताना खड्ड्यात चाक अडकून ते रस्त्यावर पडले आणि मागून येणाऱ्या कारने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या थरारक घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशिनाथ काळे (वय 61) असून, अपघाताचं कारण म्हणजे रस्ता व पेव्हर ब्लॉकच्या मध्ये पडलेला मोठा खड्डा. दुचाकी त्या खड्ड्यात अडकल्याने काळे यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी मागून आलेली कार त्यांच्यावरून गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेने पुणेकरांना हादरवून टाकलं आहे.

'आप'चा खड्ड्यांविरोधात जोरदार निषेध

या घटनेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पुण्याच्या गणेशपेठ मुख्य बसस्थानक चौकात ‘खड्ड्यात समाधी’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत, याकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही काही कारवाई होत नसल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली कळत नाही, परिणामी अनेक अपघात होत आहेत. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दिला.

आंदोलनाआधीच पोलिसांची कारवाई

प्रतीकात्मक समाधी घेण्याआधीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलन उधळून लावले. गणेशपेठ पोलिस ठाण्यात त्यांना नेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व गिरीश तितरमारे यांनी केले. त्यांच्यासोबत रोशन डोंगरे, प्रशांत अहिरराव, जॉय बांगडकर, सचिन लोणकर, ज्योती गौर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.या घटनेनंतर प्रशासनाने खड्डे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.