पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडल्याचा दावा केला आहे.

पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह गोष्टींचा खुलासा केला.

मोबाईलमध्ये सापडले हजारो आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान खेवलकर यांचा मोबाईल तपासण्यात आला, ज्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या एका 'हिडन फोल्डर'मध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो असे एकूण १७७९ आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. यामध्ये पार्टीतील मुलींचे नग्न आणि अर्धनग्न फोटो तसेच लैंगिक अत्याचार झाल्याचे दर्शवणारे व्हिडिओ आहेत. याशिवाय, घरकाम करणाऱ्या मोलकरणीचेही अश्लील अवस्थेतील फोटो यामध्ये आढळल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे.

मानवी तस्करीचा संशय

मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये 'आरोष' या नावाने ७ मुलींची नावे सेव्ह केलेली होती. या चॅटवरून असे दिसून येते की, 'आरोष' नावाचा व्यक्ती मुलींना लोणावळा आणि पुण्यातील पार्ट्यांसाठी आणत होता. यावरून मानवी तस्करीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा संशय चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

चित्रपटात काम देण्याचे आमिष आणि ब्लॅकमेलिंग

खेवलकर मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून संपर्क साधत होता. त्यांचा वापर झाल्यानंतर त्यांना पैसेही दिले जात नव्हते. मुली वारंवार पैशांची मागणी करत असल्याचंही चॅटमध्ये समोर आलं आहे. या व्हिडिओंचा वापर मुलींना नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात होता, असाही आरोप चाकणकर यांनी केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.