Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी ८ नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाला, तर २ जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. स्थानिक रहिवासी आणि माजी महापौर योगेश बहल यांनी हा मृत्यू अवैध विषारी गावठी दारूमुळे झाल्याचा आरोप केला आहे. 

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल आठ नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सामूहिक मृत्यू सत्रामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरातील अन्य दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. बंदी असलेल्या अवैध हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राजकीय प्रतिक्रिया आणि पोलिसांचा दावा

परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. "अशा गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार?" असा संतप्त सवाल उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळा दावा केला आहे. ८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूर्पूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा

उर्वरित मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती नेमकी दारू प्यायल्याने बिघडली होती का? याचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एकाच दिवसात मृत पावलेले सर्व नागरिक एकाच परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला, की पोलीस म्हणत असल्याप्रमाणे अन्य कोणत्या आजाराने किंवा कारणाने झाला? हे अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवालाअंती (Post-Mortem Report) स्पष्ट झालेले नाही. या संभ्रमामुळे फुगेवाडी परिसरातील नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे.

घटनेतील मृतांची नावे:

1. पांडुरंग फुगे 2. विजय प्रकाश राठोड 3. राजेंद्र प्रकाश राठोड 4. राजू राजपूत 5. अकबर पठाण 6. बाबा शेख 7. आनंद देसाई 8. आनंद निकाळजे

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणारे नागरिक:

1. सुभाष डिगीकर (उपचार सुरू: मेडी पॉईंट हॉस्पिटल) 2. अक्षय अवसरमल (उपचार सुरू: यशवंतराव चव्हाण रुग्णालय - YCM) अशी नावे असून दोघांचीही प्रकृती डॉक्टरांच्या मते अत्यंत चिंताजनक आहे.