वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांनी 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करत आपल्या व्यथा मांडल्या आणि एकतर्फी कायद्यांविरोधात आवाज उठवला. पुरुषांनी पिंपळ वृक्षाची पूजा करून समाज आणि शासनाचे लक्ष वेधले.

छत्रपती संभाजीनगर: वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, जिथे महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाच्या पूजेला महत्व दिले आहे, तिथेच पतीपीडित पुरुषांनी 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करत आपल्या व्यथांना, अन्यायाला आणि एकतर्फी व्यवस्थेला साकडे घातले. करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात सकाळी 10 वाजता झालेल्या या कार्यक्रमाने समाजात एक वेगळा आणि विचार करायला लावणारा संदेश दिला.

वटसावित्रीची सावित्री, पण सावत्र न्याय...

प्रत्येक स्त्री वटवृक्षाला प्रदक्षिणा घालते, सात जन्मांची साथ मिळो म्हणून. पण आज अनेक पुरुषांना एकाच जन्मात – एका चुकीच्या नात्यामुळे – आयुष्यभराचा वेदना भोगावी लागते. विवाहानंतर काही नात्यांमध्ये निर्माण होणारे दुरावे जेव्हा कायद्याच्या नावाखाली सूडबुद्धीने वळतात, तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं.

498A, घरेलू हिंसाचार कायदा (DV Act), CrPC 125 (पोटगी), आणि काही वेळा तर IPC 307 सारखे गुन्हे – ही फक्त शब्द नाहीत, तर हजारो निरपराध पुरुषांच्या आयुष्यावर कोसळणारे आघात आहेत. खोट्या तक्रारी, एकतर्फी अटकेच्या प्रक्रिया आणि पुरुषांची सामाजिक बदनामी – या सगळ्यांनी 'पुरुष' ही ओळखच एक शत्रुपक्षासारखी झाली आहे.

अनेक आत्महत्या... पण नोंद कुणाच्या लक्षात येते?

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा (NCRB) 2024 चा अहवाल सांगतो, की 2023 मध्ये तब्बल 1.20 लाख विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली, ही संख्या विवाहित महिलांपेक्षा तीन पट अधिक आहे. तरीही या मृत्यूंना "नवरा आत्महत्या" म्हणून कोणतीही गंभीर सामाजिक दखल मिळत नाही.

पिंपळ वृक्षासमोर अश्रूंचं साकडं

पत्नीपीडित पुरुष आश्रम गेल्या पाच वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा निमित्ताने पिंपळ वृक्षाची पूजा करून समाज आणि शासनाचे लक्ष पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाकडे वेधतो आहे. यंदाही अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात अनेक पिडीत पुरुषांनी आपल्या व्यथा उघडपणे मांडल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पुरुष हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष म्हणजे संपूर्ण समाजाला अंधारात ढकलणं आहे.”

संस्थेच्या प्रमुख मागण्या

राष्ट्रीय पुरुष आयोगाची तातडीने स्थापना

लिंगनिरपेक्ष कायद्यांची अंमलबजावणी

प्रत्येक जिल्ह्यात "पुरुष तक्रार निवारण केंद्र" स्थापन करणे

पोलीस ठाण्यांत "पुरुष दक्षता कक्ष"

कौटुंबिक प्रकरणे एका वर्षात निकाली काढण्याचे बंधन

उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश दुधाट, उमेश दुधाट आणि इतर पिडीत पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पुरुषांचाही आवाज आहे... त्यालाही ऐका!

आज जेव्हा समाज "समानतेची" भाषा करतो, तेव्हा ती फक्त स्त्रीसाठी का? पुरुषांनीही नात्यांमध्ये वेदना सहन केल्या आहेत, त्यांचीही आत्महत्या, मानसिक घुसमट, आर्थिक हालअपेष्टा सत्य आहेत. 'पिंपळ पौर्णिमा' ही केवळ पूजा नाही, ती एक संवेदनशील आंदोलनाची चिघळलेली मशाल आहे – जी व्यवस्थेला, समाजाला आणि कायद्याला जागे करीत आहे. “देव तरी आमचं ऐकेल का?” या भावनेतून पिंपळ वृक्षासमोर नतमस्तक होणारे हे पुरुष, केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या सारख्या हजारो पुरुषांसाठी लढा देत आहेत.