काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकल्याने त्याचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. अशा घटना नेहमीच घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता भवगान भरोसे असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे : पुणे विमानतळावर एका गंभीर प्रकाराची नोंद झाली आहे. भुवनेश्वरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानाला (फ्लाईट क्रमांक IX-1097) उतरण्याच्या वेळी धावपट्टीवर कुत्रा आढळल्याने, विमानाला हवेतच 57 मिनिटे घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकल्याने त्याचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. अशा घटना नेहमीच घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता भवगान भरोसे असल्याचे सांगितले जात आहे.

कुत्र्यामुळे विमान उतरण्यात अडथळा

शनिवारी दुपारी ४ वाजता भुवनेश्वरहून उड्डाण केलेले हे विमान पुण्यात उतरण्यासाठी सज्ज झाले असताना, वैमानिकाच्या लक्षात आले की धावपट्टीवर एक कुत्रा फिरत आहे. त्यामुळे विमान तत्काळ उतरणे शक्य नाही. धावपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने अडथळा निर्माण झाल्याने, विमानाला हवेतच थांबावे लागले. अखेर, कुत्र्याला सुरक्षितरित्या हटवल्यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली आणि विमान सुरक्षित उतरले.

प्रवाशांमध्ये भीती, प्रशासन गंभीर नाही?

या प्रकारानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’ विमान अपघाताची घटना घडली होती, आणि त्यानंतर लगेचच पुण्यात घडलेली ही घटना हवाई सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोक्याचा इशारा देणारी मानली जात आहे.

याआधीही पुणे विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या इंजिनात पक्षी धडकला होता, धावपट्टीच्या आजूबाजूला बिबट्याचा वावर दिसल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे, विमानतळ प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि हवाई सुरक्षेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हवाईतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले की, “धावपट्टीवर प्राणी अथवा पक्ष्यांचा वावर अत्यंत धोकादायक ठरू शकतो. हवाई दलाने आणि नागरी उड्डाण विभागाने यासंदर्भात त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यात संभाव्य अपघात टाळण्यासाठी धावपट्टी आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षिततेचा आढावा घेणे गरजेचे आहे.”

इंडिगो विमान वळवावे लागले विजयवाड्याकडे

पुण्याहून हैदराबादसाठी रविवारी सकाळी उड्डाण केलेले ‘इंडिगो’चे विमान (८:४३ वाजता) देखील एका तांत्रिक अडचणीत सापडले. हैदराबाद विमानतळावर हवाई वाहतूक कोंडी झाल्याने, ते विमान विजयवाडा विमानतळावर वळवावे लागले. परिणामी, प्रवाशांना विलंब आणि गैरसोयींचा सामना करावा लागला.

पुणे विमानतळावर वारंवार होणाऱ्या प्राण्यांचा वावर, पक्ष्यांचे धडकणे, विमान वळवावे लागणे अशा घटना आता नित्याची बाब बनू लागल्या आहेत. यावर तातडीने आणि शिस्तबद्ध उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरी उड्डाण मंत्रालय आणि हवाई दलाने या बाबतीत तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.