नाशिकच्या भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या भागवत कुटुंबातील महिलेची छेडछाड करण्यात आली. यानंतर गुंडांच्या टोळक्याने कुटुंबावर हल्ला केला.

मुंबई : नाशिकमधील प्रसिद्ध भावली धरण आणि धबधबा परिसरात एक कुटुंब फिरण्यासाठी गेले होते. यावेळ कुटुंबावर गुंडांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटनेत महिलेची छेडछाडही करण्यात आली. यावर जाब विचारणाऱ्या कुटुंबीयांवर टोळक्याने हल्ला केला. एवढेच नव्हे तर कुटुंबाचा तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महिलेच्या छेडछाडीवरून वादाची ठिणगी

रविवारी भागवत कुटुंबातील आठ सदस्य भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथून निघत असताना दोन युवकांनी कुटुंबातील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित युवकांनी शिवीगाळ करत कुटुंबीयांशी वाद घातला. परिस्थिती चिघळताच आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.

टोळक्याचा अचानक हल्ला

घटनेनंतर जवळ उभ्या असलेल्या काही जणांनी भागवत कुटुंबाला घेरत "आमच्या माणसांना का मारता?" असा सवाल करत वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने हे प्रकरण शांत झाल्याचे वाटत असतानाच टोळक्याने पुन्हा हल्ला चढवला.

20 किलोमीटरपर्यंत पाठलाग, गाडीची तोडफोड

कुटुंबीयांनी घटनास्थळ सोडल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि अनेक ठिकाणी वाहनाचे नुकसान करण्यात आले. हल्लेखोरांनी तब्बल 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

जीव वाचवण्यासाठी भागवत कुटुंबाने थेट अंबड पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस संयुक्तपणे तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकमधील भावली धरण आणि धबधबा परिसर हा पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र या घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.