Eknath Shinde on Nana Patole : विधानसभेत नाना पटोले यांच्या गोंधळामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आणि 'बाप बापच असतो' असे म्हणत मोदींचे कौतुक केले.

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेतील पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सभागृहात केलेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पटोले यांनी चक्क विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत घोषणाबाजी केली, ज्यानंतर त्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आणि विरोधकांनी सभात्याग केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत." पटोले यांनी हा प्रकार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

नेमका काय घडला प्रकार?

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप नेते बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या काही वक्तव्यांवरून विरोधकांनी शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी केली. यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. परिस्थिती इतकी चिघळली की काँग्रेस आमदार नाना पटोले थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ पोहोचले आणि त्यांनी कथितपणे राजदंडाला हात लावण्याचा प्रयत्न केला.

या कृतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध करत पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी निलंबित केले. या निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

शिंदे यांचा पटोले यांना सणसणीत टोला

नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "हो, बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत." पटोले यांच्या कृतीमागे प्रसिद्धीचाच हेतू होता असे सूचवताना शिंदे पुढे म्हणाले, "दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये आता त्यांचे नाव कुठेच दिसत नाही, त्यामुळे त्यांनी हा स्टंट केला असावा."

एकनाथ शिंदे यांनी पटोले यांच्या पूर्वीच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या अनुभवाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, "नाना पटोले स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना विधानसभेचे कामकाज आणि सभागृहाची प्रतिष्ठा कशी राखायची हे चांगलेच माहीत आहे. तरीही आज ते इतके आक्रमक का झाले, हे समजले नाही."

ते पुढे म्हणाले, "ते थेट अध्यक्षांच्या दिशेने गेले आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. काही दिवसांपासून दिल्लीतही त्यांचे नाव चर्चेत नव्हते. पुन्हा चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात येण्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न आहेत का? म्हणूनच त्यांनी पुन्हा 'मोदीं'चे नाव घेतले असावे. कारण 'बाप बापच असतो.' जनतेने विधानसभेत जे 'झटके' दिले आहेत आणि काँग्रेस १६ जागांवर अडकली आहे, त्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे."