Nagpur Road Accident : नागपूर जिल्ह्यातील खैरी फाट्यावर बारावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याला भरधाव स्कूल बसने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Nagpur Road Accident : नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी मार्गावरील खैरी परिसरात हृदयद्रावक अपघात घडला. बारावीचा पेपर देण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका विद्यार्थ्याला भरधाव स्कूल बसने धडक दिली. या भीषण अपघातात सिलेंडन परतेती या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आईचे ‘चांगला पेपर जाऊ दे’ हे शेवटचे शब्द

हातावर दही-साखर देऊन “चांगला पेपर जाऊ दे” असे म्हणत आईने दिलेला आशीर्वाद घेऊन सिलेंडन परीक्षा केंद्राच्या दिशेने रवाना झाला होता. तो रामटेक तालुक्यातील दाहोदा येथील जयसेवा आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीचा विद्यार्थी होता. आज त्याचा महत्त्वाचा पेपर असल्याने तो एकटाच दुचाकीवरून निघाला होता.

खैरी फाट्यावर भरधाव बसची जोरदार धडक

खापा–पारशिवणी मार्गावरील खैरी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या एका भरधाव स्कूल बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सिलेंडनला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पाहून प्रत्यक्षदर्शींचेही डोळे पाणावले.

मित्र वाट पाहत होते; कॉलेजमध्ये शोककळा

सिलेंडन पेपरसाठी येणार असल्याने त्याचे मित्र परीक्षा केंद्रावर त्याची वाट पाहत होते. मात्र अपघाताची बातमी समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. एका हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने महाविद्यालयात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून पंचनामा; बस चालकावर कारवाईची प्रक्रिया

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संबंधित स्कूल बस चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.