सार
जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
नागपूर: जिल्ह्यातील काही भागात रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला आहे. आलगोंदी येथे पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अलगोंदीच्या पोलीस पाटील यांनी दिली. दुपारी जोरदार वादळी पाऊसाला सुरूवात झाल्यानंतर पावसापासून बचावासाठी काही जण शेतातील शेतातील पाळसाच्या झाडाखाली उभे होते. नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. त्यात भागवतराव भोंडवे आणि जयदेव मनोटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान रविवारी शहरातही दुपारपासून ढगांनी आकाशात गर्दी केली होती. तापमानातही घट नोंदवली गेली.
कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलागोंदी गावात गोविंदराव पंचभाई यांच्या घरी शेतात रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील भागतराव भोंडवे आणि मध्य प्रदेशातील प्रभातपट्टण येथील जयदेव मनोटे आलगोंदी येथे आले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.