महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असून, पुढील चार आठवड्यांसाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई: महाराष्ट्रासह मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतानाच हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी दिलेला अंदाज जनतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षी मान्सून थोडा वेगात सरकत असून, त्याआधीच महाराष्ट्रात वादळी पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

३१ मेपर्यंत मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानुसार, ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्य आणि दक्षिण महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही जिल्हे या पावसाने अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि तेलंगणावर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या परिणामामुळे पावसाची शक्यता वाढली आहे. या हवामान बदलाचा प्रभाव विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अधिक जाणवेल.

पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज:

१५ ते २२ मे: महाराष्ट्र, ओडिशा, दक्षिण व ईशान्य भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस.

२२ ते २९ मे: पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम.

२९ मे ते ५ जून: कर्नाटक, बंगालच्या उपसागर किनारी पावसाचा जोर वाढणार.

५ ते १२ जून: महाराष्ट्र व कर्नाटकात पुन्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस.

मान्सूनचा प्रवास सुरू, पण अवकाळी पावसाचा जोर आधीच

हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मान्सून सध्या अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर व अंदमान भागात पोहोचला आहे. मात्र त्याआधीच अवकाळी पावसाचे परिणाम दिसून येत आहेत.

जनतेसाठी सूचना:

पुढील ४ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकरी, वाहनचालक व पर्यटनस्थळी जाणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. विजांच्या गडगडाटासह वारे आणि वादळी पावसामुळे अचानक झाडे पडणे, वाहतूक खोळंबणे अशा घटनांचा धोका आहे. अत्यावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

राज्यात मान्सूनपूर्व हवामान बदल सुरू झाले असून, पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. वाचकांनी सतर्क राहणं आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.