Kalyan-Latur Janakalyan Expressway : महाराष्ट्र सरकार MSRDC मार्फत 'कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग' उभारून मराठवाड्याच्या विकासाला गती देत आहे. हा महामार्ग ६ जिल्ह्यांतून जाणार असून, यामुळे मुंबई-लातूर प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
मुंबई : मराठवाड्याच्या विकासाला रॉकेट गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मुंबई ते लातूर हा प्रवास केवळ वेगवानच नाही, तर सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 'कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग' उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांपासून कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आला असून यामुळे ६ जिल्ह्यांचे नशीब पालटणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांचा 'ग्रीन सिग्नल'
हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकल्पाचे सादरीकरण पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा करून या महामार्गाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या महामार्गाला "जनकल्याण महामार्ग" असे नाव देऊन मराठवाड्याच्या विकासाची नवी दारे उघडण्याचा सरकारचा मानस आहे.
तुमच्या जिल्ह्यातून जाणार का हा महामार्ग?
हा महामार्ग एकूण ६ जिल्ह्यांतून जाणार असून एमएसआरडीसीने सध्या त्याच्या संरेखनाचे (Alignment) काम अंतिम टप्प्यात आणले आहे. या महामार्गाचा सर्वाधिक फायदा खालील भागांना होईल.
ठाणे: उल्हासनगर, मुरबाड
पुणे: जुन्नर
अहिल्यानगर: शहर आणि परिसर
बीड: आष्टी, पाटोदा, बीड, केज
धाराशीव: कळंब
लातूर: लातूर शहर, औसा आणि निलंगा
विशेष म्हणजे, हा महामार्ग पुढे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत नेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
काय होणार फायदा?
१. वेळेची बचत: मुंबई-ठाणे आणि मराठवाडा यांच्यातील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होईल.
२. व्यापाराला चालना: शेतीमाल आणि औद्योगिक उत्पादनांची वाहतूक जलद झाल्याने बाजारपेठांना नवी गती मिळेल.
३. कनेक्टिव्हिटी: मराठवाड्यातील दुर्गम भाग थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी जोडला जाईल.
पुढील पाऊल काय?
सध्या सल्लागारांमार्फत महामार्गाचा नेमका मार्ग निश्चित करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत अंतिम मार्ग (Route Map) आणि भूसंपादनाबाबतची अधिकृत माहिती समोर येईल. हा महामार्ग पूर्ण झाल्यास समृद्धी महामार्गानंतरचा हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा गेमचेंजर प्रकल्प ठरू शकतो.


