Mumbai Goa Highway : मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला उड्डाणपूल आणि बाह्यवळण रस्त्यांमुळे मोठा विलंब होत आहे. काही टप्प्यांची कामे पूर्णत्वास आली असली तरी इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहतूककोंडी कायम आहे.
Mumbai Goa Highway : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला अद्यापही विलंब लागत असून, चार उड्डाणपूल आणि दोन बाह्यवळण रस्ते हे त्यामागील प्रमुख अडथळे ठरत आहेत. या सहा ठिकाणांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, याची कबुली रस्ते वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही दिली आहे. चार उड्डाणपुलांची कामे पुढील चार ते सहा महिन्यांत पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पनवेल ते इंदापूर टप्प्याचे काम जवळपास पूर्ण
मुंबई–गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. पनवेल–कासू–इंदापूर या ८४ किलोमीटरच्या टप्प्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) करण्यात आले असून, हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासातील अडचणी इंदापूरपासून सुरू होत असल्याचे चित्र आहे.
इंदापूर ते झारप मार्गावर मोठे अडथळे
इंदापूर ते झारप या सुमारे ४९० किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) सुरू आहे. इंदापूर येथील ३ किमी आणि माणगाव येथील ७ किमी बाह्यवळण रस्ते हे या प्रकल्पातील सर्वात मोठे अडथळे ठरले आहेत. मूळ कंत्राटात असूनही ही कामे न झाल्याने सहा महिन्यांपूर्वी नव्याने निविदा काढण्यात आली. त्यामुळे ही बाह्यवळण रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी मार्च २०२७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडीचा त्रास
माणगावनंतर महामार्ग तुलनेने चांगला असला, तरी लांजा, निवळी, पाली आणि संगमेश्वर येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहनचालकांना गेली दोन वर्षे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, हे सर्व उड्डाणपूल मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुले केले जातील.
बांधकामाचे टप्पे (संक्षेप):
NHAI अंतर्गत:
पनवेल–कासू (४२.३ किमी)
कासू–इंदापूर (४२.३ किमी)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय अंतर्गत:
इंदापूर–वडपाले ते कळमठ–झारप (एकूण ४९० किमीहून अधिक)


