Mumbai-Ahmedabad Highway Traffic : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी नवे वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.

मुंबई : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषतः मीरा-भाईंदर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाढलेली वाहने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत होती. ही समस्या लक्षात घेऊन मीरा-भाईंदर–वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतुकीचे नवे नियोजन जाहीर केले आहे. हे बदल प्रायोगिक तत्त्वावर 15 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत.

15 ते 20 डिसेंबरदरम्यान प्रायोगिक अंमलबजावणी

नव्या नियमानुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी काशिमिरा मुख्य रस्ता वगळता इतर सर्व अंतर्गत पर्यायी रस्ते एकमार्गिका (वन-वे) करण्यात आले आहेत. सुरुवातीला हे बदल 15 ते 20 डिसेंबरदरम्यान दररोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू असतील.

अंतर्गत रस्त्यांमुळे वाढत होती महामार्गावरील कोंडी

वसई-विरार तसेच इतर राज्यांतून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे काशिमिरा नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक अमर पॅलेस, डेल्टा गार्डन, पेणकर पाडा यांसारख्या अंतर्गत रस्त्यांचा वापर करत होते. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे येत होते, तसेच पेणकर पाडा परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मार्ग देण्यासाठी वसईकडे जाणारी मुख्य वाहतूक थांबवावी लागत होती. परिणामी, महामार्गावरील कोंडी आणखी वाढत होती.

काशिमिरा परिसरात वाहतुकीचे नवे नियम

या समस्येवर उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने काशिमिरा भागातील वाहतुकीचे पुनर्नियोजन केले आहे.

नव्या नियमानुसार

मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने फक्त काशिमिरा मुख्य रस्त्यानेच जाणार

काशिमिरा परिसरातील सर्व पर्यायी रस्ते मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी असतील

अमर पॅलेस पुलाखालून मुंबईकडे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे

वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

पुढील निर्णय परिस्थिती पाहून

ही योजना प्रायोगिक स्वरूपात राबविल्यानंतर वाहतुकीची परिस्थिती तपासून आवश्यक ते कायमस्वरूपी बदल करण्यात येतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या कालावधीत वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.