भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले असले तरी, महाराष्ट्रात १० जूनपूर्वी मान्सूनची शक्यता कमी आहे. सध्याचा पाऊस हा मान्सूनपूर्व असून, शेतकऱ्यांनी दमदार पावसाशिवाय पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असून, देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाल्याने आता महाराष्ट्रातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रतीक्षा करावी लागणार 

मात्र, महाराष्ट्रातील नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे. सध्या होत असलेला पाऊस हा मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व पावसाचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होणार असली तरी तो मान्सूनच्या प्रगतीशी संबंधित नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मोठे नुकसान होऊ शकेल 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दमदार आणि सातत्यपूर्ण पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. घाईने पेरणी केल्यास पाऊस खंडित झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आणखी काही दिवस लागणार आहेत. हवामानातील बदल, वाऱ्यांचा वेग आणि समुद्रातील परिस्थिती या घटकांवर मान्सूनची पुढील वाटचाल अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यंदाच्या हंगामाबाबत हवामान विभागाने आशावादी चित्र व्यक्त केले असले तरी राज्यातील शेतकरी आणि प्रशासन सध्या मान्सूनच्या पुढील प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची शक्यता आहे.