सार

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून, संदीप देशपांडे यांनी या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा देत तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच, असे म्हटले आहे.

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी नारळ आणि शेण फेकले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून गाडीच्या काचा फोडल्याचे कृत्याचे समर्थन केले. एखादी गोष्ट सुरुवात करताना विचार करायचा असतो, पुढे त्याचा काय परिणाम होऊ शकतात. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

यावेळी संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत. तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. मराठवाड्यात जे झाले ते आणि काल जो प्रकार घडला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. हे कोणालाही आवडलेले नाही. आपणही काचेच्या घरात राहतो. आपणही दौऱ्यावर जातो, सभा घेतो, याचे भान प्रत्येकाला असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने असंच करायचे ठरवले तर महाराष्ट्रात काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

शनिवारची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती. त्यामुळे प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सारवासारव करु नये. मराठा आंदोलकांच्या आडून राजसाहेबांवर हल्ला करण्यात आला होता. पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

ठाण्यातील राड्यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक

ठाण्यात मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चढवलेल्या हल्ल्यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणही फेकण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी गडकरी रंगायतन येथील आपल्या भाषणात मनसैनिकांच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भातही कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर रविवारी मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राजन विचारे यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे काय भाष्य करणार, हे पाहावे लागेल.

कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसेच्या शाखा फलकाला काळे फासले

कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेचे शाखा फलकांची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील वाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.