सार

गुढीपाडाव्याच्या मेळाव्यात आपण लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून केली आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होत असल्याची चर्चा सुरू होती. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचेही आदेश दिले आहेत.

नरेंद्र मोदींकडून मला खूप अपेक्षा :

नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडेल.

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा:

मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं राज्यसभाही नको, विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देते आहे हे मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आता विधानसभेच्या तयारीला लागा, पुढच्या गोष्टी पुढे होतील असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा :

महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद, सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटणार?

सातारा लोकसभा मतदारसंघातील ठरला उमेदवार, शरद पवार शशिकांत शिंदेंना दिली उमेदवारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची का सोडली साथ? उद्धव ठाकरे नेत्यांना द्यायचे अशी वागणूक