माथेरान येथे फिरण्यासाठी नवी मुंबईतून काही विद्यार्थी आले होते. यावेळी शार्लोट लेक तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. 

Maharashtra : माथेरानमध्ये रविवार (ता. ८ जून) रोजी एक धक्कादायक घटना घडली. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून पावसाळी सहलीसाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तीन तरुण शार्लोट लेक तलावात बुडाल्याची घटना घडली. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख (वय १९) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

मौजमजेतून घडला अपघात

विद्यार्थ्यांचा हा समूह माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. त्यांनी पिसरनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जवळील शार्लोट लेक परिसरात थांबून मौजमजा सुरू केली. याच दरम्यान, त्यापैकी एका तरुणाचा पाय घसरून तो थेट तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी दोन तरुणांनी तलावात उडी घेतली, पण दुर्दैवाने हे तिघेही पाण्यात बुडाले.

बचावकार्य सुरू

घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांनी स्थानिकांना माहिती दिली. तत्काळ माथेरान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सह्याद्री आपत्कालीन बचाव पथकाला पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत तलावात शोधमोहीम सुरू होती. याशिवाय, खोपोली येथील सामाजिक संस्था ‘गुरूनाथ साठलेकर आपत्कालीन पथक’ देखील शोधकार्यासाठी दाखल झाले होते.

स्थानिक प्रशासन सज्ज

घटनेनंतर माथेरान पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, बचाव पथकांनी तातडीने शोध मोहीम राबवली. अद्याप तिघांचाही तपशीलवार शोध सुरू असून, पुढील कारवाईसाठी बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आहेत.