कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. अनेक पर्यटक वाहून गेले असून, बचावकार्य सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी हृदयद्रावक आहेत.

मावळ: कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने निर्माण झालेल्या भीषण दुर्घटनेनं राज्यभरात खळबळ उडवली आहे. पुलावर उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांचे आयुष्य काही क्षणांत बदलून गेलं. दुर्घटनेत सध्या पर्यंत 4 मृतदेह सापडले असून, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. या भीषण घटनेतून बचावलेला दीपक कांबळे नावाचा तरुण बोलताना म्हणाला, “ते रडत-रडत बोलत होते माझी दोन मुलं गेली...” हा क्षण फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर हृदयात खोलवर साठवून ठेवण्यासारखा होता.

घटनास्थळी काय घडलं?

दीपक कांबळेने दिलेल्या माहितीनुसार, “पुलावर गर्दी खूप झाली होती. लोकं ये-जा करत होते. अचानक पूल एका मोठ्या आवाजात हादरला आणि काही सेकंदांत खाली कोसळला. आम्ही पुढे होतो, म्हणून एका लोखंडी जाळीवर पडलो आणि वाचलो. पण मागच्यांकडे काही संधी नव्हती.”

हृदयविदारक दृश्य

दीपकच्या समोरच एका कुटुंबाचा संपूर्ण विनाश झाला. एका वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यांचा मुलगा पाण्यात गेला. “त्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागला होता, खूप रक्त वाहत होतं. ते पुन्हा पुन्हा ओरडत होते. माझी दोन मुलं गेली, माझ्या बायकोला वाचवा. आम्ही जीव तोडून प्रयत्न केला, पण ते निघत नव्हते,” असं दीपकने सांगितलं.

दुचाक्यांनी अडथळा, गर्दी अनियंत्रित

दुसऱ्या एका जखमी तरुणाने सांगितलं, “पुलावर 60-65 लोक होते आणि आठ-दहा दुचाक्या होत्या. त्यामुळे हालचाल होणं अशक्य झालं होतं. अचानक पुलाने हलकासा आवाज केला आणि काही सेकंदांत कोसळला.”

"लोखंडाला पकडलं म्हणून वाचलो"

तिसऱ्या जखमी तरुणाने दिलेल्या माहितीने या घटनेचं गांभीर्य अधिक स्पष्ट केलं. “पुलावर जवळपास 120 लोकं होती. आवाज आला तेव्हा वाटलं फक्त खडा उडाला असेल, पण क्षणात पूल कोसळला. माझ्यासमोर दोन लोकं वाहून गेले. मी लोखंडाला पकडलं म्हणून वाचलो,” असं त्याने सांगितलं.

सद्यस्थिती आणि बचावकार्य

एनडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत काही अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे, मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती कायम आहे. प्रशासन सज्ज असून, स्थानिक यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत.

कुंडमळा पूल दुर्घटना ही केवळ एक अपघात नव्हे, तर शेकडो कुटुंबांसाठी कायमची जखम ठरली आहे. दीपक कांबळेसारखे तरुण जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत, हे समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. मात्र या दुर्घटनेने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अशा संरचनांची जबाबदारी कोण घेणार, हाही प्रश्न विचारात घ्यावा लागेल.