- Home
- Maharashtra
- मनोज जरांगेंचा बीडमधून सरकारला इशारा: सत्ता बदलत असते, तिच्या जीवावर उड्या मारू नका; देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान!
मनोज जरांगेंचा बीडमधून सरकारला इशारा: सत्ता बदलत असते, तिच्या जीवावर उड्या मारू नका; देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान!
Manoj Jarange Beed Speech Highlights: मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेत मराठा समाजाला मुंबईतील आरक्षणासाठी मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आणि मराठा समाजाला त्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला.

बीड : मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेतून मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आता दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घ्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईला शांततेत जाऊन आपले मराठा आरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बीडमध्ये झालेल्या या सभेत मनोज जरांगे यांनी काही कठोर भूमिका मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजावर आलेले संकट शांततेच्या मार्गाने दूर केले जाईल. सभेमध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, "आज आमच्या सभेला डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कोणाच्याही सभेला डीजे वाजणार नाही." सत्ता कायम नसते, ती बदलत असते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ही शेवटची लढाई असून, ती आरक्षणाशिवाय थांबणार नाही, असेही ते म्हणाले.
फडणवीसांना थेट आव्हान
बीडमध्ये सभेला अडथळे निर्माण केल्याबद्दल मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली. "आता थांबा, आम्ही मुंबईत येत आहोत. त्यावेळी काय करायचं ते करा," असे थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. सरकारने जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आरक्षण दिले, तर मुंबईला जाण्याची गरजच नाही, असे सांगत, "आम्ही इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळू," असेही त्यांनी जोडले.
राजकीय नेत्यांवर टीका
जरांगे यांनी मराठा समाजाला राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. "तुमच्या जातीचा आमदार किंवा खासदार असल्यामुळे तुमच्या मुलांची फी माफ होणार नाही किंवा नोकरी मिळणार नाही," असे स्पष्टपणे सांगत, त्यांनी प्रत्येकाला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. "कोणत्याही राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. उलट, तुमच्या आमदार-खासदारांना, सरपंचांपासून ते सर्व नेत्यांना मुंबईला येण्यास सांगा," असे आवाहन त्यांनी केले.
"महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना शोधा"
सभेतील डीजेच्या मुद्द्यावरून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस चुकीचे काम करत असतील, तर त्यांनी असे करू नये. जर पोलिसांना काही वेगळेच करायचे असेल, तर त्यांनी आधी महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना शोधावे," असे गंभीर विधानही त्यांनी केले.
या भाषणातून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची पुढील दिशा स्पष्ट केली असून, सरकार आणि राजकीय नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

