Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात मात्र, मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलेला दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून पावसाने काढता पाय घेतला आहे, त्यामुळे या भागांत केवळ हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, विदर्भ वगळता इतरत्र कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नाही. हवामान विभागाने १ ऑगस्ट रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे पुढील तीन-चार दिवस या भागातील नागरिकांना सतर्क राहावे लागेल.

Scroll to load tweet…

विभागानुसार हवामानाचा अंदाज

कोकण आणि मुंबई

मुंबईसह कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. येथे ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने हलका पाऊस पडेल. मात्र, घाटमाथ्याच्या परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातूनही पावसाने विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहून हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो.

विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

राज्यात इतरत्र पाऊस कमी झाला असताना, विदर्भात मात्र पावसाचा जोर कायम आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याने या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.

या उलट, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वातावरणातील दमटपणामुळे नागरिकांनी आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.