ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटूनही महाराष्ट्रातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने उघडीप घेतली आहे.
मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. श्रावण महिन्यात अपेक्षित असलेल्या पावसाच्या सरी गायब झाल्या आहेत. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा जोर मंदावला
कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर फार कमी झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर बहुतांश भागांत उष्ण, दमट आणि कोरडे हवामान जाणवत आहे. पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची प्रतीक्षा
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे काही भागांत पावसाची तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस या भागातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक भागांत कोरडे आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उन्हाची तीव्रताही जाणवत आहे. घाटमाथा परिसरातही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.
विदर्भातही पावसाची उघडीप
अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक भागांत पावसाची तूट जाणवत आहे. सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
पुढील काही दिवस पाऊस कमीच?
सध्या महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत कोरडे, दमट आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पावसाची आणखी उडीप दिसून आल्यास खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे.


