ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याप्रकरणी ED ने मोठी कारवाई केली आहे. यात ३०.३० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, १०० हून अधिक बँक खाती आणि कोट्यवधींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.
मुंबई : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ३०.३० लाख रुपयांची रोकड जप्त केली असून १०० पेक्षा जास्त बँक खाती गोठवली आहेत.
ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी नागपूर, गोंदिया आणि अहमदाबादमधील १२ ठिकाणी करण्यात आली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट, २००२ (PMLA) अंतर्गत आरोपी आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड आणि शेअर्स गोठवण्यात आले आहेत. यासोबतच दोन बँक लॉकरही सील करण्यात आले. इतकंच नाही, तर जवळपास १.७० कोटी रुपये किमतीच्या तीन आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्याचं एजन्सीने म्हटलं आहे.
याशिवाय, तपासासाठी महत्त्वाचे असलेले ११ मोबाईल फोन आणि १ लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. यात बेकायदेशीर गेमिंग आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित डिजिटल पुरावे असण्याची शक्यता आहे. तसेच, सुमारे १६.५० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ईडीने सांगितलं की, या छाप्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि डिजिटल पुरावे हाती लागले आहेत. या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेल्या पैशांची निर्मिती, ते लपवणे, बाळगणे आणि दुसऱ्या ठिकाणी गुंतवण्याच्या प्रक्रियेचा तपास करण्यास यामुळे मदत होईल.
फसवणुकीसाठी वापरली जायची ही अनोखी पद्धत
नागपूर शहर सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे ED च्या नागपूर उप-विभागीय कार्यालयाने हा तपास सुरू केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० आणि आयटी ॲक्ट, २००० च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. ईडीच्या PMLA कायद्याअंतर्गत केलेल्या तपासात असं समोर आलं आहे की, आरोपीने तक्रारदाराला कमी वेळेत जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडलं.
"तक्रारदाराला बेकायदेशीर गेमिंग प्लॅटफॉर्मच्या लिंक्स दिल्या जायच्या. वारंवार पैसे गमावूनही त्याला आणखी पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. हे गेमिंग प्लॅटफॉर्म अशा प्रकारे मॅनिप्युलेट केले होते की, जेव्हाही तक्रारदार जिंकण्याच्या जवळ पोहोचायचा, तेव्हा तांत्रिक अडचण किंवा ग्लिच यायचा, ज्यामुळे त्याला जिंकता येत नसे. अशा फसव्या आणि बनावट पद्धतींनी तक्रारदाराची तब्बल ५८.४२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली," असं तपास संस्थेने एका निवेदनात म्हटलं आहे.
अशा प्रकारे व्हायचं पैशांचं मनी लाँड्रिंग
“या बेकायदेशीर गेमिंगमधून मिळालेले पैसे अनेक मार्गांनी गोळा केले जात होते, असंही तपासात उघड झालं आहे.”ED ने सांगितलं की, तक्रारदाराला पैसे देण्यासाठी काही खास कुरिअरमार्फत रोख रक्कम देण्यास सांगितलं जायचं. ओळख आणि हिशोबासाठी हवाला स्टाईलमध्ये 'टोकन' म्हणून नोटांचा वापर केला जायचा. किंवा आरोपीने सांगितलेल्या 'एजंट खात्यांमध्ये' बँक ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवण्यास सांगितलं जायचं.
"आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी गुन्ह्यातून मिळालेले पैसे स्वीकारण्यासाठी, ते लपवण्यासाठी आणि दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या/कंपन्यांच्या नावावर अनेक 'म्युल्स बँक खाती' (Mule Bank Accounts) वापरली. या खात्यांच्या विश्लेषणात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. हे पैसे एकतर रोख स्वरूपात काढले जायचे किंवा बनावट आयातीच्या नावाखाली भारताबाहेर पाठवले जायचे," असं ED ने पुढे सांगितलं.


