Maharashtra Weather : १ जानेवारीला मुंबईत पावसाने हजेरी लावली असून राज्यभर हवामानात चढउतार सुरू आहेत. पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात वाढ होणार असून विदर्भ-मराठवाड्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. 

Maharashtra Weather :  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना पावसाने अनपेक्षित सरप्राईज दिले. दक्षिण मुंबईत जोरदार सरी कोसळल्या, तर उपनगर आणि नवी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सकाळच्या वेळेत कार्यालयीन प्रवास करणाऱ्यांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यातील तापमानाची नोंद

राज्यातील विविध शहरांमध्ये किमान तापमानात तफावत दिसून आली. अहिल्यानगरमध्ये 12.3, जळगाव 9.2, पुणे 13.5, कोल्हापूर 17.1, छत्रपती संभाजीनगर 13.8, तर मुंबईत 20.6 आणि सांताक्रूझमध्ये 19.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे आणि उत्तरेकडील थंड हवामानाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 1 ते 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.

पुढील दिवसांत काय बदल?

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल. त्यानंतर पुन्हा 2 ते 4 अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता आहे. विदर्भात कमाल तापमानात सुमारे 2 अंशांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात गारठा कायम

विदर्भ आणि मराठवाड्यात आधीपासूनच थंडीचा कडाका वाढलेला आहे. नागपूरसह विदर्भात यंदाचा डिसेंबर गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक थंड ठरला. पुढील चार दिवस या भागांमध्ये गारठा कायम राहणार असून तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात तापमानातील मोठी घसरण

राज्यातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. परभणीमध्ये सर्वात कमी 6.8 अंश सेल्सिअस, तर धुळ्यात 7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. हवामान विभागानुसार, आगामी दिवसांत तापमानात चढउतार सुरूच राहणार आहेत.