सार

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल मंगळवार 4 जूनला जाहीर झाला. त्यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिले आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला असून नाना पटोले यांनी ट्विट करुन सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुंबईत यंदा अत्यंत चुरशीची लढत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठरली. कारण भाजपने देशभक्त म्हणत या मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम यांच्यात रोमहर्षक लढत झाली. मात्र या लढतीत उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. पण पराभवानंतर अवघ्या 12 दिवसांतच सरकारने त्यांनी पुन्हा राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची फेरनियुक्ती केल्यामुळे आता विरोधकांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. तसेच भाजप उमदेवाराला सरकारी वकील करता येणार नाही अशी भूमिकाही काँग्रेसने घेतली आहे.

भाजपच्या उमेदवाराला सरकार वकील करता येणार नाही

राज्य सरकारने न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून पाप केले, उज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना त्यांना सरकारी वकील करून त्यांनी सिद्ध केले की सरकारी वकीलही भाजपचे राहणार. पण भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

2 हजार मतांनी पराभव

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देऊन ते लोकसभेच्या मैदानात उतरले होते, भाजपनेही देशभक्त उमेदवार म्हणत निकम यांचा प्रचार केला. मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने वर्षा गायकवाड यांना पसंती दिली. उज्ज्वल निकम यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे हा पराभव त्यांच्यासाठी मानहानीकारक ठरला.

आणखी वाचा : 

Air India : एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल, दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण