एकनाथ शिंदे दिल्लीत मौलवीच्या वेशात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

| Published : Jul 30 2024, 11:12 AM IST / Updated: Jul 30 2024, 11:13 AM IST

Sanjay Raut

सार

शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मौलवीच्या वेशात जातात असा खळबळजनक दावा केला आहे. राऊत यांनी शिंदे बनावट ओळखपत्र वापरतात असा आरोप केला आहे.

शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे. ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायचे, असा खळबजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मौलवीच्या वेशात दिल्लीला जायचे एकनाथ शिंदे

मला मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत, तेव्हा-तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत. त्यांना दाढी आहेच. पण मला मिळालेल्या माहितीनुसार नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यांना मौलवीचा वेश शोभतो, असा टोला शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी तयारी केली बनावट ओळखपत्र

एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली असून ते स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेषात गेलेले आहेत. ते नाव बदलून दिल्लीत अमित शाह यांना भेटले. अजित पवार हेदेखील वेशांतर करून दिल्लीत येतात. त्यांना दोन्ही विमानतळावर कोणी रोखत नाही. एकनाथ शिंदे नाव बदलून वेश बदलून दिल्लीत येतात. त्यांनाही कोणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले आहेत. पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आदी त्यांनी बनावट कागदपत्रे बनवली आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा

ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत. त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांनी प्रवासात बोर्डिंग कार्ड्स, ओळखपत्रे वापरली ती जप्त करून अजित पवार तसेच इतर काही लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना प्रेरणा दिली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अतिरेकी आणि दहशतवाद्यांना त्यांनी दाखवली रंगीत तालीम

प्रश्न अजित पवार किंवा अमित शाह यांचा नाही. या देशात चीन का घुसला, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत, याची तालीम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवून दिली आहे, असेही शिवसेना ठाकरे गट पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा : 

४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची खासदारकी होणार रद्द?