Maharashtra : सचिन अहिर यांनी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध का, असा सवाल उपस्थित केला. त्यांनी मनसे, VBA आणि सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची तयारी दर्शवली. 

Maharashtra : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संभाव्य सहभागावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. “मनसे सरकारविरोधातील आंदोलनांत सोबत असू शकते, मग महाविकास आघाडीत का नाही?” असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी काँग्रेसला पत्रकार परिषदेत केला. त्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीत मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच त्यांनी दावा केला की, उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते.

पुणे-पिंपरी मतदारयादीतील दुबार नावनोंदणीवर टीका

अहिर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावनोंदणी झाल्याचा मुद्दा उचलला. मतदारयादीतील गोंधळाबद्दल राज्य निवडणूक आयोग जबाबदारी टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. घराघरांत तपासाच्या आदेशांनंतरही मनुष्यबळ अपुरे असल्याने कामकाज पूर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात किंवा चुकीच्या पत्त्यांसह नोंदवली असून, यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेत शहर प्रमुख संजय मोरे, गजनान थरकुडे, अशोक हरणावळ, वसंत मोरे आणि अनंत घरत उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांना मिळालेल्या पर्यावरण नोटीसवर आरोप

शहरातील गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणाशी संबंधित नोटिसा देण्यात आल्याची माहिती देत अहिर यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले की भाजप सतत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करते, पण प्रत्यक्षात धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांनाच निर्बंध लादण्याचा प्रयत्न करते.

उदय सामंतांच्या राजकीय भूमिकेवर सूचक विधान

महायुतीमधील संघर्षावर भाष्य करताना अहिर यांनी जिल्ह्यातील काही नेत्यांमध्ये “तिजोरीवरून राजकारण” सुरू असल्याचे सांगितले. भाजप स्वार्थासाठी पक्षफोड करत असल्याचा आरोप करत त्यांनी नमूद केले की, शिंदे गटातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उदय सामंत पुढे कुठे जाणार नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.