- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार या अफवेवर मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला! 'देवाभाऊ' मुख्यमंत्री जोपर्यंत आहेत, तोपर्यंत... बहिणींना दिले 'हे' वचन!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार या अफवेवर मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला! 'देवाभाऊ' मुख्यमंत्री जोपर्यंत आहेत, तोपर्यंत... बहिणींना दिले 'हे' वचन!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभावी ठरत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना बंद होणार नाही, अशी ठाम हमी दिली आहे.

'देवाभाऊ' मुख्यमंत्री जोपर्यंत आहेत, तोपर्यंत... बहिणींना दिले 'हे' वचन!
अकोला: राज्यातील विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेली लाडकी बहीण योजना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठा प्रभाव दाखवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते आपल्या प्रचारसभांतून लाडक्या बहिणींना या योजनेबाबत पुन्हा-पुन्हा दिलासा देत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच “मी आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही” असा शब्द दिल्यानंतर, आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही बहिणींना ठाम हमी दिली आहे.
फडणवीसांची अकोल्यातील जाहीर सभेत घोषणा
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची मोठी सभा झाली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. “लोक म्हणत होते की सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल. पण माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कधीच बंद होणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की,
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील गरीबांना घरे, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळाल्या.
महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला सरकारला एक वर्ष पूर्ण झाले.
या काळात लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
अयोध्या मंदिराचा कळस आणि हिवरखेडातील ‘भगवा’ आवाहन
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आजचा दिवस विशेष आहे कारण अयोध्येत राम मंदिराच्या कळस व धर्मध्वजाचे अनावरण झाले. अशीच भगव्या विजयाची परंपरा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकेतही पुढे न्यायावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
ते म्हणाले,
“शहरांकडे दुर्लक्ष झाले आहे, विकासाची गरज आहे.”
“भाजपने पारदर्शकतेला प्राधान्य देत योग्य उमेदवार उभे केले आहेत.”
“हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याचे श्रेय आमदार प्रकाश भारसाकळे यांना जाते.”
सभा संपल्यानंतर फडणवीस चिखली येथे बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहोचले.
एकनाथ शिंदेंचाही बहिणींना ठाम शब्द
नुकत्याच सटाणा (नाशिक) येथील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला, प्रचंड विजय मिळवून दिला.” “विरोधकांनी योजना थांबवण्याचा प्रयत्न केला, कोर्टात गेले. पण आम्ही योजना बंद पडू देणार नाही.” “आता KYC प्रक्रियेतल्या अडचणीही दूर करू.” त्यांनीही पुढे सांगितले, “एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही.”
लाडकी बहीण योजना, राजकीय व सामाजिक केंद्रबिंदू
लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सर्वात चर्चेत असलेला मुद्दा ठरली आहे. या योजनेंमुळे महिलांमध्ये निर्माण झालेला विश्वास आणि त्याचा निवडणुकांवरील प्रभाव लक्षात घेता, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली ही हमी महत्त्वाची मानली जात आहे.

