Maharashtra Rain Update : राज्यात अखेर पावसाला सुरूवात झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचे दमदार आगमन झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आजची एकूणच राज्यातील पावसाची स्थिती काय असणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया.
Maharashtra Rain Update : अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सूनने राज्यात दमदार आगमन झाले आहे. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. याशिवाय मुंबईतही पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहे. अशातच हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात ऑरेंज तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यभरात अतिवृष्टीची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी मुंबईसह महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये प्रवेश केला. यंदा मान्सूनचे आगमन नेहमीच्या तारखेपेक्षा १३ दिवस उशिराने झाले आहे. मुंबईत मान्सूनचा सरासरी आगमन दिवस १० जून असला तरी यावर्षी त्यासाठी २४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेड अलर्ट जारी
मुंबई आणि पालघरसाठी बुधवारी पहाटे हवामान विभागाने तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
किंग्स सर्कल येथे साचले पाणी
अंधेरी सबवे बंद; वाहतुकीवर परिणाम
रात्रीभर झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले गेले आहे. यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली. आता सकाळच्या वेळेसही वाहतूक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे.
कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस?
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या कालावधीत मध्य मुंबईतील नायर रुग्णालय परिसरात सर्वाधिक ७८.९६ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच एन. एम. जोशी मार्ग-लोअर परळ येथे ७८.४ मिमी पाऊस, परळ टीटी परिसरात ७२.६३ मिमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरातील मालाड बस डेपोमध्ये ६१.८ मिमी, तर पूर्व उपनगरातील मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर भागात ५१.२ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकणातील परिस्थिती
हवामान खात्याकडून रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसांसाठी या ठिकाणी यलो अलर्ट असणार आहे. रत्नागिरीत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या यलो अलर्ट असणार आहे.


