राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे घाट परिसरात पावसाची स्थिती कशी असणार याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर पावसाची स्थिती कशी असणार हे देखील IMD कडून सांगण्यात आले आहे. 

हवामानात बदलामुळे मान्सून सक्रिय

राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. याशिवाय मध्य भारत आणि पूर्वेकडील भागांमध्ये निर्माण झालेल्या चक्रीय परिस्थितीमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबई-ठाणे परिसरात पावसाचा जोर वाढणार

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक भागांत अधूनमधून जोरदार सरी आणि ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.

रायगड आणि कोकण किनारपट्टीवर विशेष लक्ष

रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. रत्नागिरी आणि पालघरमध्येही जोरदार सरींची शक्यता आहे. समुद्रकिनारी भागांत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमार आणि किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.

पुणे घाट परिसर पावसाच्या रडारवर

पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागांत पावसाचा जोर सर्वाधिक राहू शकतो. त्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. पर्यटनासाठी घाट भागात जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह सरी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.