Maharashtra Weather Forecast Rain : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. मुंबई, कोकणासह बहुतांश ठिकाणी अतिशय पाऊस कमी झाला आहे. ऑगस्ट महिना संपला तरी १०० टक्के पाऊस अद्याप झालेला नाही.

मुंबई : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पाऊस कमी झाला आहे. मात्र, हवामानातील बदलांमुळे काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची, तसंच मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, राज्यातील अनेक भागात आज ऊन-पावसाचा खेळ असेल.

हवामान विभागाची काय माहिती?

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड भागात ताशी जवळपास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD कडून या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पावसाची स्थिती काय?

मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसाची ४५ टक्के तूट आहे, तर महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत मुंबईत ६४ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर राज्यात जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे महत्त्वाचे महिने आहेत. मात्र ३० ऑगस्टपर्यंत निम्म्याहून थोडासाच जास्त पाऊस झाला आहे. कमी पावसाचा परिणाम पिकांवर, शेतीवर झाला आहे. पाऊस नसल्याने पिकांवर अळी, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील काही वर्षांपैकी यंदा सर्वांधिक की असल्याचं कृषी अभ्यासकांचं म्हणणं आहे.

कुठे, कसा असेल पावसाचा जोर?

परभणी आणि लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. पालघरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि ठाणे येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसंच कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.